पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा नागरिकांना नियोजनबध्द पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मचा नागरिकांकडून जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी सहाय्य करण्यासाठी द अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क 2022 या उपक्रमाद्वारे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून त्याद्वारे सर्व उपक्रमांबाबतची कार्यवाही तसेच प्रगतीची योग्य पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालायाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाइन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी “सिटीझन परसेप्शन” सर्वेक्षण करण्यात येत आहे. “नॅशनल अर्बन डिजिटल मिशन हे शेअर्ड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर” विकसित करीत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन नागरी सेवांची उपलब्धता, निवड आणि वापर या संदर्भात संपूर्ण देशभरातील नागरिकांचा दृष्टीकोन समजून घेणे हा या सर्वेक्षणाचा हेतू आहे. या सर्वेक्षणात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी परिणाम फ्रेमवर्क 2022 हा लोकसंख्याशास्त्र, अर्थव्यवस्था, शिक्षण, ऊर्जा, वित्त, पर्यावरण, प्रशासन आणि आयसीटी, आरोग्य, गृहनिर्माण, गतिशीलता, नियोजन, सुरक्षा आणि यासारख्या क्षेत्रांमधील क्रॉस-सिटी परिणामांवर आधारित एक पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस विकसित करण्याचा उपक्रम आहे.
सर्व सेवा सुविधांचा डेटाबेस अर्थात अद्ययावत माहिती महापालिकेकडे संकलित असणे आवश्यक आहे. पालिका राबवित असलेले उपक्रमांची माहितीची पारदर्शकता नागरिकांमध्ये तसेच सर्व शासकीय यंत्रणेमध्ये वाढण्यास मदत होणार आहे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.