पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाव्यतिरिक्त शालेय साहित्याचे पैसे थेट बॅंक खात्यावर जमा करणे (डीबीटी) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून डीबीटीसाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा 13 जूनपासून सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल 41 हजार 230 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेच्या वतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट दिला जातो. तसेच शालेय साहित्यामध्ये वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही असे साहित्य दिले जाते. यंदा शाळा सुरू होऊन तब्बल पाच महिने उलटल्यानंतर प्रशासनाकडून गणवेशाचे वाटप सुरू आहे. इतर शालेय साहित्याचे पैसे शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बॅंक खात्यावर पाठवण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत 23,530 विद्यार्थी आणि पालकांचे बॅंकेत खाते आहे. तर 17,700 विद्यार्थ्यांचे अथवा त्यांच्या पालकांची बॅंक खातीच नाहीत. त्यामुळे पुढील आठवड्यात त्यांची खाती उघडण्यासाठी एखाद्या बॅंकेशी चर्चा करून बॅंक खाती काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे पैसे थेट खात्यावर टाकण्यात येतील, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
“डीबीटी’चा निर्णय झाला आहे. विद्यार्थी किंवा पालकांच्या बॅंक खात्यात शालेय साहित्याचे पैसे देण्यात येणार आहेत. सुमारे 17 हजार विद्यार्थी किंवा पालकांचे बॅंकेत खाते नाही. त्यामुळे एखाद्या बॅंकेशी बोलून कॅम्पचे आयोजन करून बॅंक खाते काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.