Mahesh Gaikwad: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या उल्हासनगर परिसरात घडलेल्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. हिललाईन पोलीस ठाण्यातच २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
गोळीबाराची माहिती मिळताच भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोरच मोठी गर्दी केली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर आता कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केले आहे. इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ? असा सवाल त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार ट्वीट
“भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!” असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे.
भाजपवाल्यांचे… pic.twitter.com/AnLrONCJzI— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 2, 2024
दरम्यान, या घटनेत महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबत त्यांचा एक समर्थक जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली.
गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.