पुणे – घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, गेल्या 24 तासात ताम्हिणी घाट, अंबवणे, शिरगाव परिसरात 100 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
पुणे जिल्ह्यासह आसपासच्या घाटमाथा परिसरात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. तर काही भागांत पावसाने उघडीप दिल्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे.
गुरुवारी (दि. 6) घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे फेसाळलेले धबधबे आणि नद्या दुधड्या भरून वाहू लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत अंबवणे येथे सर्वाधिक 122 मिमी पावसाची नोंद झाली. तर शिरगाव येथे 113 आणि ताम्हिणी घाटात 112 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.
सुटीमुळे पर्यटकांची गर्दी
पावसाळा त्यात शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस म्हंटल्यालवर ताम्हिणी घाट, लोणावळा, ऍम्बी व्हॅली, वेल्हा, नाणेघाट या भागात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे सकाळपासून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. मात्र, पर्यटकांनी आपले पर्यटन सुरक्षित व्हावे, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
“एमटीडीसी’कडून उपाययोजना…
- धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक
- आवश्यक तिथे लोखंडी कठड्यांची उभारणी
- निसरड्या वाटांबाबत माहिती देणारे फलक
- धोक्याचे सेल्फी पॉइंट बंद
- आवश्यक तिथे वनविभाग, एमटीडीसीच्या कर्मचारी तैनात, हुल्लडबाजी न करण्याचे आवाहन
गेल्या 24 तासांतील पाऊस (मि.मी.)
लोणावळा 64, शिरगाव 113, ठाकुरवाडी 17, वळवण 45, अंबवने 122, भिवपुरी 12, धावडी 92, डुंगरवाडी 103, कोयना 89, ताम्हिणी 112, भिरा 64, धारावी 28.