मुंबई – सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोचे कौतुक सोशल मीडिया युजर्सकडून करण्यात येत आहे, या फोटोतून माणुसकीचं दर्शन महाराष्ट्राला पुन्हा एकदा झालं आहे.
व्हायरल होणाऱ्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याची जबाबदारी घेतली आहे. नऊ वर्षांच्या या चिमुकल्याचं नाव गणेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो पायांच्या बोटांनी लिहितो कारण त्याला जन्मतः दोन्ही हात नाहीत. पण त्याचं स्वप्न आहे सैनात जाण्याचं ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. लवकरच गणेश या नऊ वर्षांच्या चिमुकल्याला कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत.
याबाबत फेसबुकमध्ये लिहिण्यात आले आहे की,’नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी या चिमुकल्याने काल वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. हा चिमुकला दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. त्याला भेटून त्याची शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द बघायला मिळाली. पायाच्या बोटात पेन धरून तो जिद्दीने लिखाण करतो. तसेच जेवणे, कपडे परिधान हेही काम गणेश पायांनी करतो अशी माहिती गणेशचे वडील विलास माळी यांनी मला दिली.’
यावेळी गणेशच्या या जिद्दीचे कौतुक करून त्याला त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रथमेश गुलाबराव पाटील महाराष्ट्र राज्य विस्तारक (शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष) हे उपस्थित होते.