शिक्रापूर – येथील येथील सुप्रिया सोनवणे – गजरे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयशाने खचून न जाता तिसऱ्या टप्प्यात यश संपादित करीत अनुसूचित जातीतून मुलींच्या यादीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत माहेरसह सासरचे नाव उज्ज्वल केले आहे.
सुप्रिया सोनवणे – गजरे हिचे प्राथमिक शिक्षण हे पिंपरी सांडस या मूळ गावी माहेरी झाले. त्यांनतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे सुरु असताना 2010 मध्ये विवाह झाला. यांनतर सासरी पती संदीप यांनी तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्याने तिने उच्चशिक्षण सुरु ठेवत 2018 मध्ये परीक्षा दिली मात्र अपयश आले.
पुन्हा 2019 मध्ये परीक्षेत अवघ्या एका मार्काने अपयशाचा सामना करावा लागला. मात्र सासरकडील लोकांचे प्रोत्साहन व भक्कम साथ असल्याने सुप्रियाने मागे वळून पाहिले नाही. 2020 मध्ये परीक्षेत जिद्दीने अभ्यास करीत यश संपादित करुन पदाला गवसणी घातली. यावेळी तिसऱ्या प्रयत्नात अनुसूचित जातीतून मुलींच्या यादीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून माहेरसह सासरचे नाव उज्ज्वल केले आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना माझे पती तसेच कुटुंबाने मला दिलेल्या प्रोत्साहनमुळे मी हे यश संपादित करु शकले आहे. सुप्रिया म्हणाली की, पुढील काळात देखील अजून अभ्यास करुन पुढील परीक्षा देत माझे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
जिद्द ठेवल्यास यश निश्चित मुलींनी घराची जबाबदारी सांभाळून अभ्यास करीत असताना आलेल्या अपयशाने खचून न जाता जिद्द ठेवल्यास यश नक्कीच मिळते, असे मत सुप्रिया सोनवणे हिने व्यक्त केले आहे.