Chandrasekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लीप तुफान व्हायरल झाली होती. त्यात तुमच्या बूथवरील पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा आणि चहा म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलच असेल असा वादग्रस्त सल्ला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता पत्रकारांकडूनच धाब्यावर जेवणाचे निमंत्रण दिले आहे.
भंडारा जिल्ह्यातील आम्ही आत्मनिर्भर पत्रकारांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी पत्रकारांनी एक पत्रच चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे.
त्यात पत्रकारांनी आपल्यासाठी चहा आणि जेवणाची योग्य ती सोय केली आहे आणि आपल्या आवडीनुसार मेन्यू मागवता येणार असल्याचेही म्हटले आहे.
येवढेच नाही तर पत्रकारांनी तळटीप देत जेवनासाठी येताना जिल्हाध्यक्ष, आमदार व खासदारांनाही सोबत घेऊन यावे असे खोचक पद्धतीने निमंत्रण देखील आहे.