जळगाव – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावमध्ये त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. यादरम्यान दिव्यांग भगिनीने ओवाळलेले फोटो त्यांनी शेअर केले आहेत. यावेळी आपण भावूक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.सोशल मीडियावर त्यांचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
फेसबुकवर त्यांनी पोस्ट करत लिहिले आहे की,’आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.” ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले – “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” असं लिहीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडिया पोस्ट