संजय कडू
पुणे – स्वत:ला लष्करी अधिकारी भासवत लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने तसेच इतर कारणांनी लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतयांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. काही तोतया लष्करी अधिकारी तर विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून शारीरीक अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक करत आहेत. शहर पोलिसांनी मागील चार वर्षांत तब्बल 20 तोतयांना जेरबंद केले आहे.
मध्यंतरी “ओएलएक्स’वर लष्करातील जवान असल्याचे भासवत दुचाकी व इतर जुने सामान विकण्याचा बहाणा करत ऑनलाइन गंडा घालण्याची एक कार्यपद्धत सुरू होती. मात्र सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाया आणि जनजागृतीमुळे हे प्रकार कमी झाले. विवाह संस्थांच्या संकेतस्थळावरही असे प्रकार सुरु होते. मध्यंतरी एक-दोन घटनांमध्ये तरुणींची विवाहाच्या आमिषाने फसवणूक करत अत्याचार केले गेले होते.
ऑनलाइन प्रकार वगळता प्रत्यक्षात समाजात लष्करी अधिकारी म्हणून वावरणारे तोतयेही कमी नाहीत. यातील बरेच जण सार्वजनिक कार्यक्रमात पाहुणे म्हणूनही स्वत:ला मिरवताहेत. हे प्रकार वाढल्यावर लष्कराचा गुप्तचर विभाग अलर्ट झाला. त्यांनी तोतयांच्या टिप्स पुणे पोलिसांना दिल्या. अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे म्हणाले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लष्करी अधिकारी भासवून तोतयागिरीचे अनेक गुन्हे नोंदवले आहेत. लष्करी गणवेश आणि मानचिन्हांचा वापर करून ते समाजात फिरत होते. यावर्षी पुणे शहर पोलिसांनी तोतयागिरीच्या आठ गुन्ह्यांची नोंद केली असून, त्यापैकी चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
घटना पहिली : पुणे पोलिसांनी जुलै 2021 मध्ये औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील योगेश दत्तू गायकवाड याला लष्करी कर्मचारी असल्याचे भासवून अनेक महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. सैन्यात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्याने अनेकांकडून पैसेही घेतले.
घटना दुसरी : दि. 30 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील बेरोजगार व्यक्ती वासुदेव तायडे ऊर्फ विनय देव (वय 54) याने भारतीय प्रशासकीय सेवेचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून भासवल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. एका एनजीओच्या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली. ज्यामध्ये एनजीओने जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठी रुग्णवाहिका अर्पण केली होती. त्यानंतर तायडे याच्यावर भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला सैनिकी शाळेची परवानगी देण्याचे आमिष दाखवून 42 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना तिसरी : गेल्या आठवड्यात एका तोतयाचे बिंग फुटले. तेही लष्करी गणवेश शिवणाऱ्या एका टेलरने केलेल्या तक्रारीमुळे. प्रशांत पाटील नावाच्या व्यक्तीने सदर्न कमांडमध्ये लष्करी अधिकारी असल्याचे सांगत दोन गणवेश शिवून घेतले. मात्र त्याचे पैसे टेलरला दिले नाही. यामुळे त्याची तोतयागिरी उघडकीस आली.