महाबळेश्वर, दि. १३ (प्रतिनिधी)- महाबळेश्वर तालुक्यात अनेक झोन लादले गेल्याने अनेक अडचणी येत आहेत. विविध परवानग्यांसाठी दिल्ली गाठावी लागते. या आणि अशा अनेक अडचणी आहेत. एक चांगला खासदार म्हणून हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सातारा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दिली.
येथील दौऱयादरम्यान एका हॉटेलच्या सभागृहामध्ये बोलत होते. भाजप चारशे पार हे सगळं खोटे असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, माझ्या २५ वर्षाच्या राजकारणामध्ये मी पाच वेळा आमदार झालो. एक वेळ मंत्री देखील झालो. एका सामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांनी घडवलं. देशासह राज्यामध्ये असलेल्या वातावरणामुळे महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्रित आले. हा मोठा संघर्ष असून सध्याच्या स्थितीत आव्हाने पेलणं सोपं नाही. जावळी महाबळेश्वर मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण दिलीत हे मी भाग्य समजतो. आपलं प्रेम असाच अबाधित राहू दे, असे आवाहन त्यांनी केले.
शशिकांत शिंदे यांचे प्रथम शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्य बाजारपेठेतून फेरी काढण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाजारपेठेत ठिकठिकाणी महिलांच्यावतीने त्यांना औक्षण करण्यात येत होते. शिंदे यांनी येथील टॅक्सी संघटनेच्या कार्यालयास भेट देऊन तेथे टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला.
संघटनेचे अध्यक्ष अशोक ढेबे, सी. डी. बावळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर या सभागृहामध्ये महाबळेश्वर महाविकास आघाडीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फकीर वलगे यांनी केले. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश कुंभारदरे यांनी आभार मानले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शशिकांत शिंदे यांचे जुने सहकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.