मुंबई : माजी खासदार आणि जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे आज रविवार (ता.14) रोजी 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माधवराव पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, माजी खासदार माधवराव पाटील यांनी अनेक वर्षे खरेदी विक्री संघाची धुरा सांभाळली. त्यांनी जनलक्ष्मी बँकेची स्थापना केली. या बँकेच्या माध्यमातून त्यांनी नाशिकमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना मोठी मदत केली. अनेक वर्षे माधवराव पाटील साहेबांनी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्षपद भूषवले. नाशिक मधील सांस्कृतिक चळवळीला त्यांचा मोठा आधार होता. नाशिक मधील अनेक सामाजिक उपक्रमांना त्यांनी चालना दिली. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.