मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर सोमवारी रात्री भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली असून ही भेट नेमकी कशासाठी होती याचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग आणि राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढत होती. मात्र कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंनी पुन्हा भाजपवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही पक्षात फूट पडल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेट अनेक चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आता दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, काहीदिवसांपूर्वी ज्यांना वाटतं कोणीही आपला पराभव करू शकत नाही, त्यांनी या धक्क्यातून धडा घ्यावा, असे नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे यांनी भाजपला खोचक सल्ला दिला होता. मात्र दोन्ही नेत्यांमधील भेटीचे कारण अजूनही समोर आले नाही.