बारामती – क्रेडाई बारामतीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत लसीकरण मोहीम हा उपक्रम कौतुकास्पद असून संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम सुरु व्हावा, त्यासंदर्भात शासकीय पातळीवरील आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कामगार आयुक्त कार्यालय, क्रेडाई महाराष्ट्र व क्रेडाई बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांना मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ भवन, भिगवन रोड, बारामती येथे करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ते बोलत होते.
सदर मोहीम कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव श्रुती विनिता वेद सिंघल यांचे मार्गदर्शनाखाली कामगार आयुक्त सुरेश जाधव आणि क्रेडाई बारामती यांनी पार पाडली.
या कार्यक्रमास राज्य कामगार आयुक्त सुरेश जाधव , पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेन्द्र पोळ ,पुणे कामगार उपायुक्त अभय गीते, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती निताताई फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ.मनोज खोमणे व इतर मान्यवर यांनी उपस्थिती लावली होती.
याशिवाय क्रेडाई महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनील फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांचे मार्गदर्शनाखाली क्रेडाई बारामती चे अध्यक्ष सुरेन्द्र भोईटे, सचिव राहुल खाटमोडे, खजिनदार भगवान चौधर, उपाध्यक्ष जगदीश जगताप, सहसचिव राजेंद्र खराडे, हेमंत भोंग व क्रेडाई सदस्य यांनी ही मोहीम पार पाडण्यात विशेष परिश्रम घेतले. यावेळी कामगार आयुक्त सुरेश जाधव आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी मनोगत व्यक्त केले तर सुरेंद्र भोईटे यांनी प्रस्तावित केले.
“बांधकाम कामगारांसाठी मोफत लसीकरण मोहीम ही महाराष्ट्रातील पहिलीच असून त्याचा शुभारंभ बारामतीमधून झाला आहे. आजच्या दिवशी 600 पेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी लस घेतली असून या मोहिमेअंतर्गत जवळपास 2000 बांधकाम कामगारांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.” – सुरेंद्र भोईटे , अध्यक्ष बारामती क्रेडाई