जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सध्या ईडीच्या चौकशीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या ईडीच्या चौकशीवर विरोधक त्यांच्यावर कायम हल्लाबोल करत आले आहेत. आता एकनाथ खडसे समोर आले असून त्यांनी भाजप नेत्यावर हल्ला चढवला.
एकनाथ खडसे यांनी भाजपनेते आणि माजीमंत्री गिरीश महाजन यांचं नाव न घेता निशाणा साधला. ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी 1200 कोटींची संपत्ती जमवली, याची चौकशी का नाही ? असा सवाल खडसे यांनी केला आहे. गिरीश महाजन यांचे वडील शिक्षक होते.
एकनाथ खडसे यांच्यामागे ईडी लावण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी सीडी लावण्याची भाषा केली होती. मात्र खडसे यांची ईडीने चौकशी केली. आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. तरी अद्याप त्यांनी सीडी लावलेली नाही. मात्र त्यांनी आता भाजपच्या नेत्यांच्या संपत्तीवरून हल्लाबोल कऱण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, विरोधक माझं नाव खराब करण्यासाठी जिवाचं रान करत असल्याचा दावा खडसेंनी केला. तसेच नाथाभाऊंची ताकद माहित असल्यानेच विरोधक असं कृत्य करत आहेत, असंही ते म्हणाले.