यवतमाळ – मुस्लिम धर्मांतरण रॅकेटशी संबंधावरून उत्तर प्रदेश एटीएसने यवतमाळमध्ये एकास अटक केली आहे. धीरज जगताप असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी धर्मांतरण रॅकेट प्रकरणी पुसद येथून डाॅ. फराज शहा याला अटक करण्यात आली होती. धीरज डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळच्या वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनी मध्ये धीरजचे घर असून या कारवाईने त्याच्या कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे.
धीरजने पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतलेले आहे. सुरवातीला तो पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी करीत होता, त्यानंतर त्याने नोकरी सोडून स्वतंत्र कंत्राटदारी सुरु केली. त्याचे वडील पोलीस खात्यात तर आई नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षिका म्हणून निवृत्त झाले आहे. त्याचा विवाह झाला असून त्याला एक मुलगी देखील आहे. मात्र तो जास्त वेळ घरी राहत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. चार महिन्यापूर्वी तो वाढदिवसानिमित्त घरी होता मात्र त्यानंतर आई वडील व बहिणींशी त्याचा संपर्क नाही. धीरज ला झालेल्या अटकेमुळे आम्हालाही धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
धीरज हा धर्मांतराच्या प्रकियेत सक्रिय असून तो व्हाट्सग्रुप देखील चालवीत असल्याची माहिती आहे. सुरवातीला अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा असलेला धीरज दहा वर्षांपूर्वीपासून अचानक नास्तिक झाला होता. त्याचे मित्रमंडळ देखील विशिष्ट समुदायाचे होते. त्याच्या वागण्या बोलण्यात व विचारातही फरक होता. घरी न राहता तो गावाबाहेरच जास्त फिरस्तीवर असायचा त्यामुळे तो नेमके काय काम करायचा ह्याची कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनाही माहिती नव्हती.