नवी दिल्ली – भारताबरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्याची चीनची तयारी नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच सीमेपलीकडे त्यांची बांधकामे सुरू ठेवण्याचा सपाटा ठेवला आहे. त्यातही आता डोकलाम, नाकूला परिसरात चीनने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र उभारल्याचे स्पष्ट होत आहे. उपग्रहांनी टिपलेल्या छयाचित्रात या बाबी समोर आल्या आहेत.
ही क्षेपणास्त्रे भारत, भूतान आणि चीन यांच्या सीमा जेथे मिळतात, त्या ठिकाणी चीनने तैनात केली आहेत. याबाबतची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. ही क्षेपणास्त्रे 2017 मध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणापासून अवघ्या 50 किमीवर तैनात आहेत.
चीनने अलिकडेच विकसित केलेली रडारची सूचना आधी देणारी यंत्रणा सिक्कीमच्या समोर उभी केली आहे. त्यामुळे भारतीय सीमेवर त्यांनी हवाई संरक्षण यंत्रणा भक्कम करण्याचे प्रयत्न चीनने सुरू ठेवले आहेत. अलिकडे संघर्ष उडालेल्या जागेपासून जवळच जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, भारत या भागात घडणाऱ्या सर्व घटनांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे. या भागात दैनंदिन देखरेख राबवण्यात येत आहे.
काल या भागात चीन 5-जी केबल जाळे पसरत असल्याचे निदर्शनास आले होते. प्रत्यक्ष ताबा रेषे जवळ लष्कराच्या बराकी चीनने उभ्या केल्याच्या घटनाही सामोऱ्या आल्या आहेत.