Afghani trucks : पाकिस्तानने वायव्येकडील अफगाणिस्तानच्या सीमेवरील प्रवेशद्वार अफगाणी ट्रक चालकांसाठी बंद केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानी प्रशासनाने ही माहिती दिली आहे. अफगाणी ट्रक चालकांना तोरखाम प्रांतातील अधिकारी पासपोर्ट आणि व्हिसाची मागणी केली जाऊ लागली आहे, असे अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील सांस्कृतिक आणि माहिती विभागाचा संचालक नूर मोहम्मद हनिफने सांगितले.
या सीमेवरून अफगाणी ट्रक चालक आतापर्यंत कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय ये-जा करत असत. कारण त्यांच्याकडे तसे कोणतेही वैध कागरदपत्रे नसायची. पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला प्रत्युत्तर म्हणून अफगाणी अधिकारीही सीमेवर पाक ट्रक चालकांना पासपोर्टची मागणी करायला लागले आहेत. नांगरहार प्रांताच्या गव्हर्नरच्या कार्यालयानेही एक निवेदन प्रसिद्धीस देऊन या मुद्यावर दोन्ही देशांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यानची तोरखाम सीमा अलिकडच्या काळात अनेक वेळा बंद करण्यात आली होती. दोन्ही देशांच्या सीमेवरील सैनिकांमध्ये संघर्ष झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये ही सीमा ९ दिवसांसाठी बंद होती. शनिवारी ही सीमा बंद केल्यामुळे नाशवंत वस्तू, भाजीपाला, फळे आदींचे ट्रकच्या रांगा दोन्ही बाजूला लागल्या आहेत. या मालाचा पुरवठा थांबल्यास पाकिस्तानमध्ये या वस्तूंचा मोठा तुटवडा लगेचच निर्माण होतो.
अफगाणिस्तानमध्ये तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेला मुक्त आश्रय दिला जातो आणि ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये घातपाती हल्ले करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. मात्र या संघटनेला घातपाती कारवायांसाठी अफगाणी भूमीचा वापर करण्याची अनुमती देण्यात आली नाही, असे तालिबानने म्हटले आहे.
जमियत उलेमा इस्लामचा तालिबानला पाठिंबा…
पाकिस्तानमधून अफगाणी शरणार्थ्यांना अलिकडे मोठ्या संख्येने परत पाठवण्यात आले आहे. तेंव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानमधील एक राजकीय पक्ष जमियत उलेमा ए इस्लामचे प्रमुख आणि देशातील ज्येष्ठ राजकीय नेते मौलाना फजलूर रेहमान यांनी अलिकडेच काबूलला भेट दिली होती. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यापासून त्या देशाला भेट देणारे ते पाकिस्तानचे पहिले नेते आहेत.