सातारा -सातारा येथील एका 26 वर्षीय बेकरी व्यवसायिकाला एका मुलीशी असणाऱ्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेलिंग करुन त्याच्याकडे चार लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या जयश्री यादव आणि आनंद शिंदे या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत दोघांनाही अटक झाली नव्हती. या दोघांनी संबंधित बेकरी व्यावसायिकाकडून पहिल्या टप्प्यात 70 हजार रुपये उकळले असून नंतर आणखी चार लाखांची खंडणी मागितली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, महेश हणमंत धनावडे (वय 26, रा. गोडोली, मूळ रा. खडखडवाडी, पो. धुमाळवाडी, ता. कोरेगाव) याचा बेकरीचा व्यवसाय आहे. त्याचे आणि त्याच्या मैत्रिणीचे शारीरिकसंबंध आहेत. त्याचे चित्रीकरण करुन जयश्री दिलीप यादव आणि आनंद शिंदे (दोघे रा. अहिरे कॉलनी, सातारा) यांनी महेश धनावडे याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली.
यावेळी महेशने दोघांनाही 70 हजार रुपये दिले. नंतर या दोघांनी चार लाखांची मागणी केली आणि ‘तू जर हे पैसे नाही दिलेस तर तुझे व्हिडिओ व्हायरल करु,’ अशी धमकी दिली. महेश धनावडे याने सातारा शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार गुलाब जाधव करत आहेत.