- पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकी : ऍपवरही बदलले नाव
पिंपरी – करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास तुमच्याकडे बघू, अशी धमकी देणारा फोन भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने शहरातील एका नामांकित रुग्णालयास आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यालयातून असा फोन केला नसल्याचे सांगून संबंधित रुग्णालयास गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या राज्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपआपल्या परीने गोरगरीबांना मदत करीत आहे. शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या लॅंडलाइन फोनवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाने आला. करोनाच्या संकटामुळे आम्हाला गोरगरिबांना मदत करायची आहे. त्यासाठी तुम्ही 25 लाख रुपये द्या, असे म्हणत पैशाची मागणी केली. पैसे घेण्यासाठी पर्वतीमधील एका कार्यकर्त्यास पाठवत असल्याचे सांगितले.
पैसे न दिल्यास बघून घेण्याची भाषा फोनवरील व्यक्तीने केली. त्यानंतर फोन करणाऱ्याने मालकाचा नंबर घेऊन त्यांच्याकडेही पैशाची मागणी केली. त्यांनी याबाबत रुग्णालयाचे काम पाहणाऱ्या एका डॉक्टरांशी बोलण्यास सांगितले. फोन क्रमांकाची माहिती येत असलेल्या ऍपवर देखील त्या फोनचे नाव भाजप प्रदेशाध्यक्षाचे येत होते.
ते डॉक्टर भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलेच संपर्कात असल्याने त्यांनी याबाबत थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र आपण किंवा आपल्या कार्यालयातून अशा प्रकारचे फोन कोणालाच केले नसल्याचे सांगत याबाबत पोलिसात तक्रार देण्यास सांगितले.
याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर म्हणाले, शुक्रवारी (दि. 17) याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीला आम्ही लवकरच शोधून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.