नगर – भाजपचे आमदार पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर आणला आहे. चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आमदार पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
भाजप आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धुत, किसनराव लोटके, अशोक बाबर, निर्मलाताई मालपाणी, ऍड. शारदा लगड, आरिफ पटेल आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या विरुध्द भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या भाषेत व्यक्तीगत पातळीवर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्व आहे. देशावर व राज्यवर आलेल्या संकटकाळात त्यांनी सक्षमपणे भूमिका मांडून मोठे योगदान दिले आहे. भाजपचे आ. पाडळकर यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.