पुणे : वादग्रस्त घराच्या जागेची मोजणी करता का, विचारत तिघांना मारहाण केल्याच्या आरोपाच्या प्रकरणातून चौघांची सबळ पुराव्या अभावी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी.एम.निराळे यांनी निर्दोष मुक्तता केली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खटला निकावर ठेवण्यास हरकत नाही, अशी लेखी हमी बचाव पक्षाचे वकील ऍड. खंडेराव टाचले यांच्याकडून घेतली होती.
संतोष रामदास अग्नेन (वय 40), गणेश रामदास अग्नेन (वय 35), बाळू रघुनाथ अग्नेन (वय 45) आणि बापू रघुनाथ अग्नेन (वय 52, सर्वजण, रा. नांदेडगाव, ता. हवेली) अशी त्या चौघांची नावे आहेत.
बचाव पक्षातर्फे ऍड. खंडेराव टाचले आणि ऍड. मनिष मगर यांनी काम पाहिले. याबाबत महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ, भाची आणि शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला 9 डिसेंबर 2018 रोजी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साक्षीदारांना तपासणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासण्यात आलेच नाही. त्यामुळे त्यातील मजकुर संशयापलिकडे जावून सिध्द झाला नाही.
जखमा या घटनेदिवशीच आरोपीने मारहाण केल्यामुळे झाल्याचा पुरावा न्यायालयापुढे आला नाही. स्वतंत्र्य प्रत्यक्षदर्शी पुरावा नसून, फिर्यादी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती दिसून आल्याच्या निष्कर्ष काढत न्यायालयाने वरील आदेश दिला.