नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, त्यांना जामीनदेखील मंजूर करण्यात आला खरा पण आता यावरून राजकीय वातावरण चिघळण्यास सुरुवात झाली आहे. आता काँग्रेसच्या माजी मंत्री रेणुका चौधरी यांनी पंतप्रधानांवर मानहानीचा खटला दाखल करण्याची भाषा केली आहे.
काँग्रेस नेता आणि माजी मंत्री रेणुका चौधरी या पंतप्रधानांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणाच्या वेळी रेणुका चौधरी यांच्या हास्याला शूपर्णखाची उपमा दिली होती असा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार हा खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंबंधी रेणुका चौधरी यांनी एक ट्विट केले असून यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी चौधरी याना शूपर्णखा असे म्हटल्याचा उल्लेख आहे. ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींनी मला सभागृहात शूपर्णखा म्हटले असल्याचे सांगितले आहे. तसेच रेणुका चौधरी यांनी लिहिले की, आपण पंतप्रधानांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. त्यामुळे आता न्यायालये कशी वागतात ते बघू, असा टोलाही त्यांनी या ट्विटमध्ये लगावला आहे.
This classless megalonaniac referred to me as Surpanakha on the floor of the house.
I will file a defamation case against him. Let’s see how fast courts will act now.. pic.twitter.com/6T0hLdS4YW
— Renuka Chowdhury (@RenukaCCongress) March 23, 2023
दरम्यान,7 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत होते, त्यावेळी रेणुका चौधरी एका गोष्टीवर मोठ्याने हसल्या होत्या. यावर पंतप्रधानांनी तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना सांगितले, ‘अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की, रेणुका जींना काहीही बोलू नका. आज रामायण मालिकेनंतर असे हास्य ऐकण्याचे सौभाग्य मिळाले. पंतप्रधान मोदींच्या या बोलण्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या हास्य कल्लोळ उमटला होता.