कर्जत -राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा बिगुल वाजला असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत 18 जागांसाठी 2 हजार 596 मतदार मतदान करणार आहेत.
राजकीय मंडळींकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. ग्रामपंचायती, सोसायटी आणि सर्वसाधारण संस्थेच्या मतदारांची चाचपणी करून उमेदवार निश्चित करणे, पॅनल तयार करणे अशा प्रकारची लगबग बघायला मिळणार आहे.
बाजार समितीवर आपले वर्चस्व असावे यासाठी राजकीय पक्ष मोठी ताकद लावत असतात. कर्जतमध्ये भाजपचे आ. प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये यानिमित्त संघर्ष पहावयास मिळणार आहे. 76 सोसायटीचे संचालक हे 11 सदस्य आणि 91 ग्रामपंचायतींच्या सदस्यांतून 4 असे एकूण 15 सदस्य, तसेच दोन व्यापारी व एक हमाल असे एकूण 18 सदस्य बाजार समितीमध्ये असतात. या निवडणुकीत 18 जागांसाठी 2 हजार 596 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये सेवा संस्था मतदारसंघातील 11 जागांसाठी 970, तर ग्रामपंचायत मतदारसंघातील जागांसाठी 845, व्यापारी मतदारसंघातील 2 जागांसाठी 489, तर हमाल मापाडी व तोलाई मतदारसंघातील 1 जागेसाठी 292 सदस्य मतदान करणार आहेत.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सोमवारी (दि. 27) निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख दि. 27 मार्च ते 3 एप्रिल आहे. त्यानंतर दि. 5 एप्रिलला आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दि. 6 रोजी वैध अर्ज प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दि. 6 ते 20 दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख देण्यात आली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी दि. 21 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 28 रोजी मतदान होईल. मतमोजणी मतदान झाल्यापासून तीन दिवसांच्या आत करण्यात येणार आहे.