संबंधितांवर कारवाई करा ः माहिती सेवा समितीची ग्रा.पं. प्रशासनाकडे मागणी
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभिकरण करण्यात आलेल्या भिंतींवर अनेक व्यावसायिकांनी त्याच्या व्यवसायांचे जाहिराती फलक व पोस्टर लावलेले आहेत. पोस्टर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमापूर्वी काढून भिंतींचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माहिती सेवा समितीचे शिक्रापूर शहर अध्यक्ष संतोष काळे यांनी शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींचे काही दिवसांपूर्वी सुशोभिकरण करून या भिंतींवर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत, तर शेजारी असलेल्या मारुती मंदिर समोर आकर्षक कमान उभारण्यात आलेली आहे. त्याशेजारी ग्रामपंचायत इमारतीच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत, परंतु येथील शाळेच्या भिंतींवर आणि मुख्य कमानीवर अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायांचे फलक आणि पोस्टर लावून विद्रुपीकरण केले आहे.
त्यामुळे या भिंतींवरील पोस्टर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमापूर्वी हटवून भिंतींचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये होत असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे परिसरात शालेय मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील पार्किंगसाठी स्वतंत्र पट्टे आखून त्या पार्किंगला शुल्क आकारावे.
तसेच येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून बाकडे बसवावेत आणि जिल्हा परिषद शाळेशेजारूनच पुणे-नगर महामार्ग जात असल्याने येथे वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे रस्त्याची पाहणी करून रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी संतोष काळे यांनी शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कार्यवाही करू
शाळेच्या भिंतींवरील पोस्टर तातडीने हटवून इतर बाबींचा देखील विचार करून कार्यवाही केली जाईल, असे ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी सांगितले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यामार्फत हे पोस्टर हटविले जातील.