आम्ही एकत्र राहिल्यास केंद्रात पुन्हा सत्ता : मंत्री आठवले

अकोले  – आपण म्हणजे आपला पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आलो. त्यामुळे केंद्रात पाच वर्षे सत्ता राहिली. आगामी काळातही आम्ही एकत्र राहिल्यास पुन्हा केंद्रात भाजप व मित्र पक्षांचेच सरकार असेल, असा निर्वाळा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

कळस कृषी प्रदर्शनाचे आज अकोले येथे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे होते. त्यांनी दोन तासांनी व अकरा किलोमीटर अंतरावरील सातव्या मैलावर त्यांनी निमाई डेअरीला भेट दिली. तेव्हा पत्रकारांनी त्यांना छेडले असता, दिल्ली विधानसभेमध्ये आम्हाला भाजपाने जागा वाटपात सहभागी करून घेतले नाही.

त्यामुळे तेथे मैत्रीपूर्ण सात-आठ जागांवर आम्ही लढत आहोत, असे बोलल्यानंतर अकोले येथील त्यांच्या भाषणाची आठवण करून दिली. तेव्हा मात्र त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. कळस कृषी प्रदर्शनाच्या बद्दल त्यांनी छत्रपती युवा मंडळाला कौतुकाचे शब्द ऐकवताना वेगवेगळे 300 स्टॉल, यांत्रिकी मशिनरी, शेतीविषयक माल व जनावरांचे प्रदर्शन हे प्रेक्षणीय आहे.

केंद्राकडून व राज्याकडून या प्रदर्शनासाठी योग्य तो निधी मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करू. त्यासाठी विहित नमुन्यात प्रकल्प आराखडा मंडळाने करून पाठवावा, असे आवाहन केले. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली असण्याची शक्‍यता व्यक्त करून यातून उद्‌ध्वस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्या कामी आपणही हातभार लावू, अशी हमी दिली.

कृषी प्रदर्शनामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांचे शेतीतील नवीन प्रयोग, यावर भाष्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नदीजोड प्रकल्पाची देशभर अंमलबजावणी केली गेली असती, तर आज अतिवृष्टीच्या समस्येला देशाला सामोरे जावे लागले नसते, असा हवाला दिला.

आरपीआयचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांच्या सहकार्याचा गौरवाने उल्लेख करीत तीन वेळेला लोकसभेत, एक वेळेला राज्यसभेत जाण्याची आपल्याला संधी मिळाली. पाच वर्षे केंद्रात मंत्री राहिलो व यापुढेही आपण राहू, अशी खात्री त्यांनी यावेळी बोलताना दिली.

या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांना सांगून आपण निधी मिळवून देऊ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जसे ऐकता, तसे आमचे ही ऐकावे, असे मिश्‍किल टिप्पणी केली व आपला पक्ष पैसेवाला नाही. पण आमच्या पक्षातील कार्यकर्ते राजाभाऊ कापसे हे बरे (सधन) आहेत, असे सांगून ते या प्रदर्शनाला 50 हजार रुपये देणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवाय आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत राज्य सरकार 16 टक्के व केंद्र सरकार दहा टक्के आरक्षण देणार आहे आणि मराठा समाज उभा राहण्यासाठी सर्वच बाजूने मदत होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बीजमाता राहीबाई पोपेरे व आरपीआयचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांची यावेळेस भाषणे झाली.

प्रास्ताविक सागर वाकचौरे यांनी केले. आलेल्या अडचणींचा पाढा वाचताना सागर वाकचौरे यांना अश्रू अनावर झाले. कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम उरकल्यावर ना. आठवले यांनी विजय वाकचौरे यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांनी पक्ष मजबूत करण्याकामी आवाहन केले. शांताराम संगारे, विजय वाकचौरे आदींनी आपल्या समस्या मांडल्या.

आणि प्रसिद्ध झाले कळस

आपल्या शीघ्र कवितांसाठी ना. रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. यावेळी त्यांनी गेले अनेक दिवस मंडळाने केला नाही आळस । मंडळाने केला नाही आळस।। म्हणूनच कृषी प्रदर्शनाने । आणि प्रसिद्ध झाले कळस । प्रसिद्ध झाले कळस।। अशी छोटी कविता सादर केली. त्यास उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.