पुणे – डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्धघाटनाचा दिवस गाजवला. डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने २० षटकामध्ये ८ गडी गमावून १६७ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानासमोर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा डाव १५८ धावांवर मर्यादित राहीला.
दुसर्या सामन्यात ओंकार खाटपे याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने यजमान डेक्कन जिमखाना अ संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना क्लबचा डाव ११७ धावांवर मर्यादित राहीला.
धीरज फटांगरे याने ४८ धावांची खेळी केली. पीबीकेजे संघाच्या निहाल तुसामद, विवेक सेलार आणि यश खळदकर यांनी अचूक गोलंदाजी करून डेक्कन संघाच्या धावसंख्येला वेसण घातली. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमीने हे आव्हान १२ षटकात पूर्ण केले. ओंकार खाटपे याने ४० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७६ धावांची खेळी केली. मेहुल पटेल याने ३८ धावांचे योगदान दिले.
स्पर्धेचे उद्धघाटन डेक्कन जिमखाना क्लबचे ग्राऊंड्समन दत्ता पडेर, विशाल वाल्हेकर, संदीप पन्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव मृगांक राठी, मंगेश भुस्कूटे, पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट विभागाचे सचिव आणि एमसीए समिती सभासद विनायक द्रविड, रणजीपटू निरंजन गोडबोले, सुबोध परांजपे, निखील दिक्षीत, सचिन आराध्ये, मोहन जाधव आणि अजय कारेकर यावेळी उपस्थितीत होते.