सहायक निबंधक रोकडे ः जिल्हा बॅंकेत शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता
मंचर -आंबेगाव तालुक्यातील 7 हजार 282 शेतकऱ्यांना एकूण 42 कोटी 76 लाख रुपये कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने शेतकरी जिल्हा बॅंकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे सहायक निबंधक (सहकार) पी. एस. रोकडे यांनी दिली.
कर्जमाफीचा लाभ मिळाला किवा नाही, याबाबत चौकशी करण्यासाठी पुणे जिल्हा बॅंकेच्या शाखेत आणि राष्ट्रीयकृत बॅंक शाखेत शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकरी आनंदित होत आहेत. 2 हजार 900 शेतकऱ्यांचे बॅंकेशी आधार प्रमाणीकरण झाले असून, संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ताबडतोब पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा आणि राष्ट्रीयकृत बॅंक शाखेतून व सोसायटीमार्फत कर्ज पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा (थकीत) झालेल्यांना लाभ मिळणार आहे.
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व रेशनिंग दुकानाच्या फलकावर लावण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. कर्जमाफी योजनेचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत, सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी पी. एस. रोकडे व कर्मचारी सोमवार (दि. 2) पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखांना भेटी देऊन समस्यांचे निवारण करीत होते, अशी माहिती मंचर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विभागीय अधिकारी एल. बी. थोरात यांनी दिली.
उशिरापर्यंतच्या कामामुळे प्रमाणीकरण लवकर
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व रेशनिंग दुकानाच्या फलकावर लावण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. कर्जमाफी योजनेचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत, त्यामुळे शनिवार (दि. 29) आणि रविवार (दि. 1) सुटीचा दिवस असूनही आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 18 शाखेतील कामकाज दोन्ही दिवस रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे उशिरापर्यंतच्या कामामुळे प्रमाणीकरण लवकरहोणार आहे.