शेवगाव – तालुक्यातील भातकुडगाव येथील राणुबाईवस्ती जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी पालक व ग्रामस्थ सरसावले आहेत. त्यासाठी पालकसभेत 25 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा होवून येथील विद्यार्थ्यांच्या इ-लर्निंगची मुहूर्तमेढ रोवली आहे.
भातकुडगाव ग्रामपंचायतीअंतर्गत बडेवस्ती नजीक जिल्हा परिषदेची राणुबाईवस्ती प्राथमिक शाळा असून तेथे वाडीवस्तीवरील मुले शिक्षण घेतात. मुलांमध्ये शैक्षणिक अभिरुची वाढविणाऱ्या ई-लर्निंग साहित्याच्या उपलब्धतेसाठी मुख्याध्यापक अशोक टेकुळे यांनी सरपंच राजेश फटांगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.2) पालकसभेचे आयोजन केले होते.
यावेळी केंद्रप्रमुख प्रमिला बोर्डे, संभाजी आहेर,जनार्दन घुमरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुर्गेष्ट आदी उपस्थित होते. निधीची अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी भौतिक सुविधांची उपलब्धता व्हावी यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचे निश्चित केले.
यावेळी गोरख बडे, मोहन बडे, भाऊसाहेब बडे, हरिदास धायतडक, डॉ. सोमनाथ बडे, डॉ. शुभांगी बडे यांच्यासह पालकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यातून पंचवीस हजाराची रक्कम उभी राहीली. त्यातून स्मार्ट एलईडी संच खरेदी करुन इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक अशोक टेकुळे यांनी प्रास्ताविक केले. आशा लाड यांनी आभार मानले.
ध्वजस्तंभासाठी आर्थिक मदत
शाळेमध्ये ध्वजस्तंभ नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सणानिमित्त होणाऱ्या झेंडावंदनासाठी भातकुडगाव शाळेत जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन वस्तीवरील डॉ. शुभांगी व सोमनाथ बडे यांनी त्यासाठी आर्थिक मदत देवू केली.