पुणे – शहरात दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, मंगळवारीही तब्बल 44 करोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 2 हजार 77 वर गेली आहे. दरम्यान मंगळवारी दिवसभरात 1 हजार 204 नवीन बाधित सापडले आहेत. तर 1 हजार 123 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
मंगळवारी (दि.25) दिवसभरात 6 हजार 370 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 4 लाख 14 हजार 294 जणांच्या तपासणीत 85 हजार 700 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यातील 68 हजार 900 बाधित करोनामुक्त झाले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
गेल्या 24 तासांत एकूण 58 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दीतील 44 तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यातील 14 जणांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत 14 हजार 723 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 796 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 483 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.