नवी दिल्ली -संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात 18 बैठका होतील. अधिवेशनाच्या वेळापत्रकाची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीने केली आहे. देशातील करोना संकट कायम असल्याने आगामी अधिवेशनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल अशा पद्धतीने खासदारांसाठी आसन व्यवस्था केली जाणार आहे. अधिवेशन काळात राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच वेळी चालते.
मात्र, आगामी अधिवेशनात वेगळे चित्र दिसेल. एका सभागृहाचे कामकाज सकाळी, तर दुसऱ्या सभागृहाचे कामकाज सायंकाळी होईल. याआधीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज करोना संकटामुळे 23 मार्चला गुंडाळण्यात आले.