पुणे – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलच्या लॉन्च कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी शहा यांनी सहकार क्षेत्राबाबत विविध माहिती दिली. विशेष म्हणजे नुकतेच शिंदे फडणवीस सरकारसोबत दाखल झालेले अजित पवार हे देखील यावेळी शहा यांच्यासोबत उपस्थित होते. शहा यांनी यावेळी अजित पवार यांना उद्देशून केलेल्या टिपण्णीची जोरदार चर्चा आहे. .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले. शहा यांनी कार्यक्रमात म्हंटले की, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा (अजित पवार) पहिल्यांदाच आले असून त्यांच्यासोबत मी पहिल्यांदाच मंचावर कार्यक्रम करत आहे. मला त्यांना सांगायचे आहे, दादा तुम्ही खूप दिवसांनी योग्य ठिकाणी बसला आहात. हीच जागा योग्य होती परंतु तुम्ही थोडासा उशीर केलात.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह पुढे म्हणाले की, बहुराज्यीय सहकारी संस्थांची देखरेख करणाऱ्या केंद्रीय सहकार निबंधक (CRCS) चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजिटल होत आहे. आता कोणत्याही बहुराज्यीय सहकारी संस्थेला शाखा वाढवण्यासाठी, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी किंवा इतर कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.