World Cup 2023 New Zealand vs South Africa Match : एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (बुधवार,दि.1 नोव्हेंबर ) भरात असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान राहणार आहे. या स्पर्धेत यंदा दक्षिण आफ्रिकेने सातत्यपूर्ण कामगिरी करताना सहा सामने खेळले असून त्यात पाच विजय मिळवत गुणतालिकेत 10 गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे. त्यांना केवळ एकच पराभव स्वीकारावा लागला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेळ – दुपारी 2 पासून
ठिकाण – पुणे
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांचे 6 सामन्यांतून 4 विजय व 2 पराभवांसह 8 गुण झाले आहेत. भारतीय संघ गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वलस्थानी आहे. दक्षिण आफ्रिका संघाने यंदाच स्पर्धेत कमालीचे सातत्य राखले असून न्यूझीलंडचा संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्हीत तुलनेने कमकुवत वाटत आहे. या उलट दक्षिण आफ्रिकेचे पहिले पाचही फलंदाज अत्यंत भरात आहेत. त्यांचा सलामीवीर क्वांटन डीकॉक, एडन मार्करम, नियमित कर्णधार टेम्बा बवुमा यांनी सातत्याने धावा केल्या आहेत.
तर दुसरीकडे न्यूझीलंडबाबत बोलायचे तर राचीन रवींद्र, डेव्ह कॉनवे, टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, विल यंग व ग्लेन फिलीप्स हे देखील भरात आहेत. केवळ काही महत्त्वाच्या सामन्यांत त्यांच्या गोलंदाजांना फारसे यश मिळालेले नसल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गत स्पर्धेत ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. यंदा ज्या पद्धतीने या दोन्ही संघांनी वाटचाल केली आहे ती पाहता त्यांपैकी एक संघ अंतिम फेरी निश्चितच गाठेल मात्र, त्यापूर्वी त्यांना आज होणारा सामना जिंकणे महत्वाचे आहे.
राचीनच्या खेळाकडे लक्ष राहणार
न्यूझीलंडचा संघ उलटफेर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत जायंट किलर म्हणूनच संबोधले जाते. त्यांचा नवोदित फलंदाज राचीन रवींद्रही भरात आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत दोन शतके तर दोन अर्धशतके फटकावताना समोरच्या संघावर सातत्याने दडपण राखले आहे. आजच्या लढतीतही त्याच्यावरच लक्ष केंद्रित असेल.
लक्षवेधी..
– डीकॉक, मार्करमला रोखण्याचे न्यूझीलंडसमोर आव्हान
– क्लासेन व मिलरही ठरू शकतात धोकादायक
– जेन्सन व शम्सीच्या गोलंदाजीचे आव्हान
– हेनरी, बोल्ट व सॅंटनरकडून न्यूझीलंडला अपेक्षा
– दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या चार फलंदाजांना रोखावे लागणार
– जेम्स निशामही ठरेल ट्रम्पकार्ड