New Zealand Vs South Africa 1st Test Result Update : रचिन रवींद्रचे 240 धावांचे द्विशतक आणि केन विल्यमसनचे 118 धावांचे शतक आणि त्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडने आज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा दुसरा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. या विजयासह टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
A winning start to the Tegel Test Series at Bay Oval! Kyle Jamieson (4-58) and Mitch Santner (3-59) leading the push to victory on Day 4. Scorecard | https://t.co/W6fz0adYsU pic.twitter.com/qfyD4um7yk
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 7, 2024
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून 4 फेब्रुवारी रोजी माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना रचिन रवींद्रचे 240 धावांचे द्विशतक आणि केन विल्यमसनच्या 118 धावांच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावांची मोठी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेकडून नील ब्रँडने सहा विकेट घेतल्या. रुआन डिस्वार्टने दोन गडी बाद केले. त्शेपो मोरेकी आणि डॅन पॅटरसन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
यानंतर न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांच्या प्रत्येकी तीन विकेट्स आणि रचिन रवींद्र आणि काइल जेमिसन यांच्या प्रत्येकी दोन विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 72.5 षटकांत 162 धावांत गारद झाला. यासह न्यूझीलंडला पहिल्या डावात 349 धावांची मोठी आघाडी मिळाली.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातही केन विल्यमसनने 109 धावांची शतकी खेळी केली आणि त्यानंतर चार विकेट्सवर 179 धावा केल्यानंतर डाव घोषित केला आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 529 धावांचे लक्ष्य दिले. 529 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 247 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडवर्ड मोर शून्य धावा आणि नील ब्रँड तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक 87 धावा केल्या. रेनार्ड व्हॅन टोंडर 31, झुबेर हमजा 36, कीगन पीटरसन 16, डेन पॅटरसन 15 धावा करून बाद झाले. क्लाईड फोर्टिन 11 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव 80 षटकांत 247 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात काइल जेमिसनने चार विकेट घेतल्या. मिचेल सँटनरला तीन बळी मिळाले. ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
न्यूझीलंडचा दुसरा सर्वात मोठा कसोटी विजय…
न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांनी पराभव केला, हा त्याच्या पुरुष संघाचा कसोटी क्रिकेटमधील धावांच्या फरकाच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा विजय आहे. न्यूझीलंड पुरुष संघाचा सर्वात मोठा कसोटी विजय 423 धावांचा आहे, जो त्यानी 6 वर्षांपूर्वी श्रीलंकेविरूध्द 2018 मध्ये मिळवला होता.