जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे मंगळवार (दि.31) विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी (दि.31) पिंपरखेड ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे, आगामी होऊ घातलेल्या निवडणूका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घ्यावे तसेच मराठा आरक्षणाच्या लढ्यात आत्महत्या करून मराठा समाजासाठी बलिदान करणाऱ्या तरूणांना श्रद्धांजलीचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. मंजूर ठरावाची प्रत तहसीलदार यांना देण्यात येणार असल्याचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव राक्षे यांनी बहुजन समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदाम बर्डे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मेजर बळवंत बोंबे, स्वाती बोंबे, शिवाजी बोंबे, दामोदर दाभाडे, माऊली ढोमे, हेमंत नरवडे, बबनराव बोंबे, किरण गायकवाड, भिमाजी गुंजाळ, रामदास गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, ग्रामसभेत ठराव करीत मराठा आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बंदला प्रतिसाद
सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला प्रतिसाद देत पिंपरखेड अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवसायिक, दुकानदारांनी दुकाने बंद ठेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.