World Cup 2023 #INDvPAK Match Toss Update : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आज (शनिवार,14 ऑक्टोबर) पहिल्यांदा आमनेसामने येत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावरील स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. याआधी सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता भारत आणि पाकिस्तानचे संघ एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. रोहित शर्माच्या शानदार शतकामुळे संघाला मोठा विजय मिळाला. आता भारतीय संघाची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. (India won the toss and elected to field) कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केलं आहे.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.