World Cup 2023 India vs New Zealand Match Live Score : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .
टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 5 गडी बाद करत आणखी एक विक्रमाची नोंद केली आहे.
या विश्वचषकात मोहम्मद शमीला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर क्रिझवर स्थिरावलेल्या रचिन रवींद्रला बाद करत 159 धावांची भागीदारी मोडली. शेवटी त्याने तीन विकेट घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने 10 षटकात 54 धावा देत पाच बळी घेतले.
कपिलचा विक्रम मोडीत…
यासह मोहम्मद शमी 50 षटकांच्या विश्वचषकात दोनदा पाच विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, आशिष नेहरा रॉबिन सिंग आणि युवराज सिंग यांना एकसाथ मागं टाकले आहे. या सर्व गोलंदाजांनी विश्वचषकात एकदाच पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. (Mohammed Shami breaks Kapil Dev’s record for most five-wicket hauls in World Cup) यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकात शमीने इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.
Mohammed Shami picked up a five-wicket haul on his return to the starting XI 🙌#CWC23 #INDvNZ pic.twitter.com/py7uonKts9
— ICC (@ICC) October 22, 2023
वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट घेणारे भारतीय…
2 – मोहम्मद शमी*
1- कपिल देव
1 – आशिष नेहरा
1 – व्यंकटेश प्रसाद
1 – रॉबिन सिंग
1 – युवराज सिंग
शमीने कुंबळेचाही मोडला विक्रम…
दरम्यान, नवव्या षटकात मोहम्मद शमीला रोहित शर्माने गोलंदाजीसाठी पाचारण केले. शमीने या विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने किवी सलामीवीर विल यंगला क्लीन बोल्ड केले व भारताला दुसरे यश मिळवून दिले. यंग 27 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. या विकेटसह शमीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकाच्या इतिहासात शमीची ही 32वी विकेट आहे. यासह शमीने अनिल कुंबळेचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे. 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. शमीने या प्रकरणात अनिल कुंबळेला मागे टाकले आहे.
फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर एकूण 31 विकेट्स होत्या, तर शमीची विश्वचषकातील ही 32वी विकेट होती. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत झहीर खान भारताकडून अव्वल स्थानावर आहे, ज्याने 44 विकेट घेतल्या आहेत. तर जवागल श्रीनाथ तितक्याच विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय
झहीर खान : 44
जवागल श्रीनाथ : 44
मोहम्मद शमी : 32
अनिल कुंबळे : 31
शमी चार सामन्यानंतर मिळाली संधी…
अष्टपैलू व उपकर्णधार हार्दिक पंड्या जायबंदी ठरल्याने शमीला संधी दिली गेली. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये मोहम्मद शमी पहिलाच सामना खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी शमी चार सामन्यांत खेळू शकला नव्हता. सांघिक संयोजनामुळे त्याला जागा उपलब्ध झाली नाही. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला सतत संधी दिली जात असून सिराजही चांगली कामगिरी करत आहे.