#CWC23 #INDvNZ : शमीने मोडला अनिल कुंबळेचा विक्रम…

World Cup 2023 India vs New Zealand : भारतीय संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला सातत्याने डावलले जात होते. त्यातच जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांनाच जास्त संधी दिली जात होती. बुमराह नुकताच मोठ्या दुखापतीतून तंदुरुस्त होत संघात परतला आहे. अशा वेळी तुलनेने दुबळ्या संघांविरुद्ध तरी त्याला विश्रांती देणे गरजेचे होते. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्माने शमीच्या पारड्यात मत टाकले नव्हते. आता अष्टपैलू व उपकर्णधार हार्दिक पंड्या जायबंदी ठरल्याने शमीला संधी दिली गेली. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये मोहम्मद शमी पहिलाच सामना खेळत आहे.
नवव्या षटकात मोहम्मद शमीला रोहित शर्माने गोलंदाजीसाठी पाचारण केले. शमीने या विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने किवी सलामीवीर विल यंगला क्लीन बोल्ड केले व भारताला दुसरे यश मिळवून दिले. यंग 27 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. या विकेटसह शमीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकाच्या इतिहासात शमीची ही 32वी विकेट आहे. यासह शमीने अनिल कुंबळेचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे. 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. शमीने या प्रकरणात अनिल कुंबळेला मागे टाकले आहे.
फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर एकूण 31 विकेट्स होत्या, तर शमीची विश्वचषकातील ही 32वी विकेट होती. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत झहीर खान भारताकडून अव्वल स्थानावर आहे, ज्याने 44 विकेट घेतल्या आहेत. तर जवागल श्रीनाथ तितक्याच विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय
झहीर खान 44
जवागल श्रीनाथ 44
मोहम्मद शमी 32
अनिल कुंबळे 31
शमी चार सामन्यांत खेळला नाही
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी शमी चार सामन्यांत खेळू शकला नव्हता. सांघिक संयोजनामुळे त्याची जागा उपलब्ध झाली नाही. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला सतत संधी दिली जात असून सिराजही चांगली कामगिरी करत आहे.





