Mohammed Shami Fitness, IPL 2024 : मोहम्मद शमी 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. मात्र विश्वचषकानंतर शमी मैदानात परतू शकला नाही. वास्तविक, दुखापतीमुळे शमी काही काळ क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या टाचेला दुखापत झाली होती आणि या दुखापतीसह तो विश्वचषक खेळला.
तथापि, 26 फेब्रुवारी रोजी शमीवर शस्त्रक्रिया झाली आणि आता आयपीएल 2024 दरम्यान त्याच्या फिटनेसबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या नवीनतम फिटनेस अपडेट काय सांगते आणि शमी मैदानात कधी परत येऊ शकतो हे जाणून घेऊया…
खरं तर आतापर्यंत शमी बेड रेस्टवर होता, पण आता त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या पायावर आधार घेऊन उभा असल्याचे दिसत आहे, यादरम्यान त्याने शॉर्ट्स आणि पिवळा टी-शर्ट घातलेला आहे. फोटोला कॅप्शन देताना भारतीय वेगवान गोलंदाजाने लिहिले आहे की, “परत ट्रॅकवर आलोय आणि पुन्हा यशाची चाहूल लागली आहे. वाट अवघड असेल, पण शेवट गोड असेल.” (Back on track and hungry for success. The road may be tough, but the destination is worth it)
Back on track and hungry for success. The road may be tough, but the destination is worth it.
#NeverGiveUp #shami #mdshami #mdshami11 #recovery pic.twitter.com/1KZmU6gJxB
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) April 7, 2024
मैदानात परत कधी येणार?
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने, आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी शमीबद्दल अपडेट देताना सांगितले होते की, तो इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामातून पूर्णपणे बाहेर असेल. याशिवाय, भारतीय वेगवान गोलंदाज जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले होते. त्याचवेळी तो मैदानात कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये केली आश्चर्यकारक कामगिरी…
विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यांमधून बाहेर पडल्यानंतर, पाचव्या सामन्यापासून शमीला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले, त्यानंतर त्याने या स्पर्धेत एकूण 7 सामने खेळले. 7 सामन्यांमध्ये, भारतीय वेगवान गोलंदाजाने 10.70 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या, ज्यामध्ये 57 धावांत 7 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.