World Cup 2023 India vs Netherlands Match Results : एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय संघाने अखेरच्या साखळी लढतीत नेदरलॅंड्सवर 160 धावांनी विजय मिळवला. चारशे धावांचा डोंगर उभारल्यावर नेदरलॅंड्सला 47.4 षटकात 250 धावांवर रोखत भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व साखळी सामने जिंकत सलग नववा विजय साकार केला.
भारताने विजयासाठी दिलेल्या 411 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सची सुरुवात निराशाजनक झाली. डावातील दुसऱ्याच षटकात वेस्ली बारेसीला महंमद सिराजने बाद केले. त्यानंतर मॅक्स ओद्वोड व कॉलिन ऍकरमन यांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, हे दोघेही पाठोपाठ बाद झाले.
ऍकरमनने 35 तर, ओद्वोडने 30 धावा केल्या. यावेळी सायब्रॅंड एंजलब्रेक्टने कर्णधार स्कॉट एडवर्डससह संघाचे शतक फलकावर लावले. एडवर्डस स्थिरावल्यानंतर विराट कोहलीच्या गोलंदाजीवर 17 धावांवर परतला. पाठोपाठ बास दी लीडेने 12 धावा करत चमक दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. सायब्रॅंडने संघाचे दीडशतक फलकावर लावले मात्र, वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला व 45 धावांवर तंबूत परतला.
लोगन वॅन विकने तेजा निदामनोरूसह संघाचे द्विशतक फलकावर लावले. निदामनोरूने अर्धशतकी खेळी करत लढत दिली मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. त्याने 54 धावांच्या खेळीत 39 चेंडूत 1 चौकार व 6 षटकार फटकावले. विकने 16 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रोलेफ वॅन डर मर्वनेही 16 धावा केल्या व थोडीफार लढत दिली. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजाने त्यांचे शेपूट गुंडाळले व त्यांचा डाव 250 धावांवर संपला आणि भारताने 160 धावांनी विजय मिळवला.
कोहली व रोहितने केली कमाल…
नेदरलॅंड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला विराट कोहलीने आपल्या गोलंदाजीवर बाद केले. यष्टीमागे जात असलेल्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात त्याचा झेल यष्टीरक्षक लोकेश राहुलने अचुक टीपला. एकदिवसीय सामन्यांत कोहलीने मिळवलेला हा पाचवा बळी ठरला. कर्णधार रोहित शर्मानेही गोलंदाजी केली व एक बळीही मिळवला. रोहितने नेदरलॅंड्सचा अर्धशतकवीर तेजा निदामनोरूला बाद केले. एकदिवसीय सामन्यांतील रोहितचा हा आठवा बळी ठरला.
तत्पूर्वी, रोहित, गिल आणि कोहली यांच्या अर्धशतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या झंझावती शतकाच्या जोरावर भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून 50 षटकात 410 धावा केल्या. विश्वचषकातील भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 413 धावा केल्या होत्या.
#CWC23 #INDvNED : श्रेयस-राहुलची झंझावती शतके; टीम इंडियांचा नेदरलँड्ससमोर धावांचा डोंगर…
भारताकडून फलंदाजीत श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 10 चौकार अन् 5 षटकारासह सर्वाधिक नाबाद 128 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. लोकेश राहुल 64 चेंडूत 102 धावा करून बाद झाला.त्याने शानदार खेळी केली आहे. या विश्वचषकातील हे पाचवे जलद शतक आहे. त्याचबरोबर भारतासाठी हे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले आहे. राहुलनं आपल्या खेळीत 11 चौकार अन् 4 षटकार लगावले.
कर्णधार रोहितने 61 आणि गिल-कोहलीने प्रत्येकी 51 धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ते देशासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले.
नेदरलँड्सकडून गोलंदाजीत बस डी लीडे यानं सर्वाधिक दोन बळी घेतले. त्यानं रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना बाद केले. मीकरेन आणि मर्व यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.