पणजी – गोव्यात होणाऱ्या 53व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. या वर्षी निवड झालेल्या सिनेमांमध्ये कथात्मक, लघु माहितीपट, माहितीपट, भयपट आणि कथात्मक ऍनिमेशनपट असं वैविध्यपूर्ण मिश्रण आहे.
एएनयू, रोटी कून बनासी, ट्युजडे वुमन, गिध्ध, गोपी, आयर्न वुमन ऑफ मणिपूर, व्हेअर माय ग्रॅंडमदर लिव्हज, लडाख 470, द एक्सलेशन आणि रिटर्न ऑफ द जंगल या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.
या सर्व कलाकृतींमधून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधीत विषय मांडले गेले आहेत. हे चित्रपट इंग्रजी, हिंदी, बंगाली, मारवाडी, कन्नड आणि माओरी या न्यूझीलंडमधल्या भाषेत आहेत.
याशिवाय चित्रपट महोत्सवात ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज रसिकांच्या भेटीला येत आहेत. यात सलमान खान द्वारा निर्मित आणि नवोदित कलाकार असलेला फॅरे (हिंदी) , ए.आर. रहमानचे संगीत आणि अरविंद स्वामी, विजय सेतुपती आणि अदिती राव हैदरी या प्रमुख कलाकारांचा गांधी टॉक्स (मूक पट ) ,
पंकज त्रिपाठी आणि पार्वती थिरुवोथू अभिनीत कडक सिंग (हिंदी), सिद्धार्थ रंधेरिया अभिनीत हरी ओम हरी (गुजराती), नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत रौतू की बेली (हिंदी), विजय राघवेंद्र अभिनीत ग्रे गेम्स (कन्नड) या चित्रपटांचे जागतिक प्रीमियर्स तसेच अमेझॉन ओरिजिनल्सच्या दोन सिरीज (तेलुगु) ,
नागा चैतन्य पार्वती थिरुवोथु प्रमुख कलाकार असलेली धुठा(तेलुगू) आणि आर्य अभिनीत द व्हिलेज (तमिळ), तसेच अक्षय ओबेरॉय आणि उर्वशी रौतेला अभिनीत दिल है ग्रे (हिंदी) आणि तरसेम सिंगचा डियर जस्सी (पंजाबी) या चित्रपटांचे आशिया प्रीमियर इफ्फी मध्ये होणार आहेत.