FIH Pro League 2024 : भारतीय महिला संघाला रविवारी महिला FIH प्रो लीग 2023-24 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 3-1 असा पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. याआधी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला चीनविरुद्ध 2-1 ने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय महिला संघ आता आपला पुढचा सामना बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
भारतासाठी एकमेव गोल नवनीत कौरने (9व्या मिनिटाला) केला, तर नेदरलँड्ससाठी जेन्सेन यिबी (3रे आणि 34वे मिनिट) आणि व्हॅन डर एल्स्ट (20वे मिनिट) यांनी गोल केले. दरम्यान, दोन्ही संघ एप्रिल 2022 मध्ये शेवटचे आमनेसामने आले होते आणि सामना 1-1 ने बरोबरीत संपला होता.
𝐅𝐮𝐥𝐥 𝐓𝐢𝐦𝐞: 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝟏-𝟑 𝐍𝐞𝐭𝐡𝐞𝐫𝐥𝐚𝐧𝐝𝐬
Resilient India put up an impressive fight against the mighty Dutch, but brilliance from leading #FIHProLeague goalscorer Yibbi Jansen, who scored twice, in the first and third quarter, lifts the defending champions to… pic.twitter.com/SQ5jjQf2fb
— International Hockey Federation (@FIH_Hockey) February 4, 2024
भारत विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलँड्स संघाच्या जॅनसेन यिबीने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून आपल्या संघाचे खाते उघडले. या गोलला भारतीय संघाने सामन्याच्या 9व्या मिनिटाला चोख प्रत्युत्तर दिले, जेव्हा नवनीत कौरने उत्कृष्ट पास मिळवला आणि कोणतीही संधी वाया न घालवता तिने विरोधी गोलरक्षकाला चकमा देत गोल केला. पुढच्याच मिनिटाला भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण या संधीचा फायदा उठवण्यात ते अपयशी ठरले. यासह पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत होते.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघ गोल करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत होते. दुसऱ्या क्वार्टरमध्ये डच खेळाडूंनी उजव्या बाजूने वेगाने आक्रमण करण्यास सुरुवात केली, ज्याचा फायदा त्यांना 20 व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा व्हॅन डेर एल्स्टने भारतीय बचावाला चुकवत मैदानी गोल करून संघाच्या स्कोअरमध्ये भर घातली. त्याचवेळी, सविता पुनिया आणि कंपनीने पुढच्याच मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. यानंतर भारताच्या नवनीत कौरने चटकन चेंडूवर ताबा मिळवत डच बचावला चकमा देण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधी खेळाडूंनी तिचा प्रयत्न हाणून पाडला. अशा प्रकारे हाफ टाईमपर्यंत नेदरलँड्सने भारतीय संघाविरुद्ध 2-1 अशी आघाडी कायम ठेवली.
हाफ टाईमनंतर भारतीय संघाने आपल्या आक्रमणाला गती देण्याचा प्रयत्न केला, मात्र 34व्या मिनिटालाच डच संघाने पेनल्टी कॉर्नर जिंकून त्याचे गोलमध्ये रूपांतर करून आपली गोलसंख्या वाढवली. यानंतर त्यांनी मैदानावर बराच वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवला आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करण्यात यश मिळाले नाही.
#FIHProLeague24 (Women’s) : सलामीच्या लढतीतच चीनचा भारताला पराभवाचा धक्का…
खेळाचा चौथा क्वार्टर भारतासाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्यांनी 47व्या आणि 48व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण डच बचावासमोर गोल करण्यात भारतीय संघाला यश आले नाही. अखेरीस नेदरलँड्सविरुद्ध भारताचा 3-1 असा पराभव झाला.