नवलाख उंब्रे येथे आढळलेल्या कावळ्याचे “फोटो व्हायरल’
इंदोरी – कावळा हा काळा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण कावळा पांढरा असतो हे तुम्हाला सांगितल्यास कदाचित विश्वास बसणार नाही. असे असले तरी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे मावळ येथे चक्क पांढरा रंगाचा कावळा स्थानिक ग्रामस्थांना दिसला आहे.
परिसरामध्ये या कावळ्याविषयी कुतूहल निर्माण झाले. कुणी त्याला “देवाचा कावळा’ तसेच “संकटी कावळा’ म्हणायला लागले. एरव्ही सुद्धा आपल्या कामाचा असेल तेव्हा म्हणजे दशक्रिया विधीला वगैरे कावळ्याची वाट पाहिली जाते. त्यासाठी ताटकळत बसावे लागते.
तो येतो, काकस्पर्श कराते तेव्हा त्याला खूप महत्त्व प्राप्त होते. पण तोच कावळा एखादाला चोच मारून गेला, तर तुला कावळा शिवलाय, बाजूला सरक असे म्हणून त्या कावळ्याला द्वेष केला जातो. एवढेच नाही तर “कसा कावळ्यासारखा टपकला?’ अशी वल्गना केली जाते. मनात आले हा मिश्रहारी कावळा मानवाच्या किती उपयोगाच्या आहे अन्न साखळीतील, निसर्ग साखळीतील, पर्यावरण राखणाऱ्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे. त्या विषयी कुणी विचार का केला नाही ? पांढरा रंग दिसला तर तो चर्चेचा विषय ठरला.
नवलाख उंब्रे (ता. मावळ) येथील पॉवर हाऊस परिसरात नॉर्मा ग्रुप कंपनीत हा पांढरा कावळा दिसून आला. काही लोकांनी त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पितृपंधरवड्यात असा पांढरा रंगाचा कावळा दिसल्याणने कुतूहल निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर गमतीदार विनोद करुण हा फोटो व्हायरल होत आहे. मावळचे राजकारण तापलेले असताना सर्वपक्षीय चर्चाचा विषय एक दिवस तरी हा पांढरा कावळा ठरला आहे.
मुळातच पांढरा रंग अशा जातीचा कावळा कोठेही आढळत नाही. कावळ्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेला “एल्बिनो’ नावाच्या या आजारामुळे हा कावळा पांढरा झाल्याचे समोर आले असल्याचे पक्षीतज्ज्ञांनी सांगितले.
नवलाख उंब्रे येथील नॉर्मा ग्रुप कंपनीत दोन-तीन दिवसांपासून पांढरा कावळा दिसत होता. अनेक वर्षांपासून मी रोज सकाळी व दुपारी जेवणातील काही भाग बाहेर ठेवत असतो ते खाण्यासाठी कावळे, खारूताई व प्रसंगी मोर देखील खाण्यास येतात. दोन-तीन दिवसांपासून एक पांढरा कावळा देखील ते खाद्य खाण्यासाठी येत आहे.
– सुरेश शिंदे, प्रत्यक्षदर्शी.