मावळात 3 लाख 45 हजार 400 मतदार

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : प्रांताधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार बर्गे यांची माहिती

वडगाव मावळ – मावळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख 45 हजार 400 मतदार आहेत, 2019 विधानसभा निवडणूक शांततामय व निर्भीड वातावरणात होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. मावळ तहसीलदार कार्यालयात सोमवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजता आयोजित निवडणूक नियोजन बैठकीत त्यांनी माहिती दिली. या वेळी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, आर. एल. कांबळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मावळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 27) ते शुक्रवारी (दि. 4) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मावळ तहसीलदार कार्यालयात दाखल करण्याचा कालावधी आहे. शनिवारी (दि. 5) सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. सोमवारी (दि. 7) दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहेत. सोमवारी, 21 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल. गुरुवारी, 24 ऑक्‍टोबर सकाळी 10 वाजता मावळ तहसील कार्यालयाच्या महसूल भवन येथे मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी रविवार, 27 ऑक्‍टोबरपर्यंत आहे.

या वेळी आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येईल. राजकीय पक्षांना व उमेदवारांना कार्यक्रम घेण्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सोमाटणे, वरसोली व उर्से आदी टोलनाक्‍यावर स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्‍त करून वाहने तपासणी सुरू करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच व्हिडिओ चित्रीकरणाचे काम सुरू केले आहे.

204 मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी 370 मतदान केंद्र असून, त्या मतदानकेंद्रावर निवडणूक घेण्यासाठी सुमारे 2020 अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त करण्यात येणार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख 45 हजार 400 मतदान आहे. त्यामध्ये पुरुष मतदान एक लाख 78 हजार 752 तर स्त्री मतदान हे एक लाख 66 हजार 645 मतदार असून, तृतीयपंथी मतदान तीन आहेत.

लोणावळा नगराध्यक्षांचे वाहन अद्याप जमा नाही

निवडणुकीसाठी 48 बस, 27 मिनीबस, 22 जीप आदी नियुक्‍त करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय अधिकारी 40, फिरते पथक 10 तसेच स्थिर सर्वेक्षण पथक 10 असे नियुक्‍त केले आहेत. एकूण सहा शासकीय वाहने असून, त्यापैकी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ यांचे वाहन अद्यापही जमा झाले नाहीत, असेही सुभाष भागडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.