IPL 2024, CSK vs RCB, Virat Kohli :- CSK आणि RCB संघ IPL 2024 साठी पूर्णपणे तयार आहेत. या मोसमातील पहिला सामना आज (शुक्रवार, 22 मार्च) चेन्नईत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीला या सामन्यात एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
कोहली T20 मध्ये 12,000 धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला फक्त 6 धावांची गरज आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. वास्तविक, कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 376 टी-20 सामन्यांमध्ये 11 हजार 994 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. कोहलीला 12 हजार टी-20 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने असे केल्यास टी-20 मध्ये 12 हजार धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. आयपीएल 2024 च्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहली ही कामगिरी करू शकतो. कोहलीनंतर रोहित शर्मा भारतीय खेळाडूंच्या यादीत आहे.
सर्वात जास्त टी-20 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने 463 सामन्यात 14 हजार 562 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 22 शतके आणि 88 अर्धशतके केली आहेत. शोएब मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 542 सामन्यांमध्ये 13 हजार 360 धावा केल्या आहेत. किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 660 सामन्यांमध्ये 12 हजार 900 धावा केल्या आहेत. ॲलेक्स हेल्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 12 हजार 319 धावा केल्या आहेत. डेविड वाॅर्नरने 370 टी20 सामन्यात 12 हजार 065 धावा केल्या असून तो पाचव्या तर कोहली हा सहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, विराट कोहलीचाही आयपीएलमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 237 सामन्यांमध्ये 7 हजार 263 धावा केल्या आहेत. कोहलीने या स्पर्धेत 7 शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 113 धावा आहे. शेवटचा मोसमही कोहलीसाठी चांगलाच होता. त्याने 14 सामन्यात 639 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. आता कोहली पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.