IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई पॉइंट टेबलमध्ये तळाच्या 10व्या स्थानावर आहे. पण आता या सर्व अडचणी आणि संकटांमध्ये सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav ) रूपाने मुंबई इंडियन्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुखापतग्रस्त झालेल्या सूर्यकुमार यादवला आयपीएल खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
सूर्याची अनुपस्थिती मुंबईसाठी अनेक समस्या निर्माण करत होती. सूर्याने मुंबईसाठी अनेकदा फिनिशरची भूमिका निभावली आहे. क्षणात सामना बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. ‘एक्स्प्रेस स्पोर्ट्स’नुसार, सूर्याला आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र, त्याच्या पुनरागमनाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुंबईचा पुढील सामना रविवारी (07 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून सूर्या या सामन्यात खेळताना दिसणार आहे. सूर्या दिल्लीविरुद्ध खेळला तर वाईट टप्प्यातून जात असलेल्या मुंबईसाठी तो मोठा दिलासा देणारा ठरेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्याला झाली होती दुखापत…
दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेदरम्यान सूर्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानात परतू शकला नाही. आता त्याच्या T20 विश्वचषकातून पुनरागमनाची बातमी आली आहे, जी मुंबईसाठी तसेच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे कारण IPL नंतर T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून खेळवला जाणार आहे. सूर्याच्या घोट्याला दुखापत झाली होती, त्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सूर्याची आयपीएल कारकीर्द…
सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 139 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 124 डावांमध्ये 31.85 च्या सरासरीने आणि 143.32 च्या स्ट्राइक रेटने 3249 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 103 धावा आहे.