मंचर – नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला शुक्रवार (दि. 10) पासून उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात तळी भंडार करुन दर्शन घेतले. यावेळी पोलीस प्रशासनाने घाटामध्ये बैलगाडा शर्यती होऊ नयेत. यासाठी लाकडी वासे उभे करुन बैलगाडा शर्यतीला प्रतिबंध केला. पौष पोर्णिमेला दरवर्षी श्रीक्षेत्र थापलिंग येथे खंडोबा देवाची यात्रा दोन दिवस भरते. यावेळी पहाटे पाच वाजता विधीवत देवाची पुजा झाली.
सकाळी सात वाजल्यापासून गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. थापलिंग गडावर यात्रेसाठी जाण्यासाठी भाविकांना राजगुरुनगर, नारायणगाव आगारातून बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांची चांगलीच सोय झाली. भाविक भक्त दरवर्षी गडावर कुलदैवताचा कुलाचार जागरण, गोंधळाचा कार्यक्रम करुन पूर्ण करतात. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असल्याने येथील घाटात बैलगाडे पळवू नये. यासाठी घाटामध्ये लाकडी वासे उभे करुन पोलीस प्रशासनाने अडथळा तयार केला आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.