पिरंगुट -पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील काही भागात करोनाचा उद्रेक होत असल्याने सोमवारी (दि. 12) रात्री 12वाजेपासून गुरुवार (दि. 23) पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यात मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश केला असल्याने तालुक्यातील अनेक भागांत सर्व नियमांना तिलांजली देत नागरिकांची किराणा, फळ, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
पिरंगुट येथे रविवारी (दि. 12) बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे विशेषतः किराणा माल, भाजी विक्रीच्या दुकानात मोठी गर्दी जमली होती. ग्राहकांच्या मागणीला तोंड देताना दुकानदारांची दमछाक होत होती.
दरम्यान, पिरंगुट, भूगाव, घोटावडेफाटा, लवळेफाटा, पौड आदी ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. पुढील सोमवारी (दि. 21) गटारी अमावस्या आहे. मात्र, लॉकडाऊन असल्याने या भागातील मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. त्यामुळे खवय्यांनी मटण, चिकन व मासे विक्रीच्या ठिकाणी मोठी गर्दी करत खरेदी केली. पेट्रोल पंप सुरू राहणार की बंद याबाबत योग्य ती माहिती न मिळाल्याने पेट्रोल पंपावर गर्दी दिसून येत होती.
मद्यप्रेमींनी केला स्टॉक
मद्य विक्रीच्या दुकानासमोर मद्यापींच्या रांगा लागल्या होत्या. यात अनेकांनी पुढील 10 ते 15 दिवसांचा कोटा म्हणून स्टॉक करून ठेवला आहे.