सातारा एसटी स्टॅंड परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याने तारांबळ
सातारा – चैतन्य आणि जल्लोषाचा माहोल तयार केलेल्या दीपोत्सवाचे पर्व संपल्याने गावाकडे आलेले चाकरमानी पुन्हा पुणे- मुंबईकडे परतू लागल्याने गुरुवारी सातारा मध्यवर्ती एसटी स्टॅंडवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सातारा- पुणे, बोरिवली व कोल्हापूर तसेच इतर आगारातून धावणाऱ्या लांब पल्ल्यांना गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. सातारा आगाराला दर 20 मिनिटाला गाडी सोडण्याची कसरत यामुळे करावी लागली. मनुष्यबळाचा अभाव आणि एसटी बसेसची टंचाई अशा दुहेरी कोंडीमध्ये सध्या सातारा आगार सापडले आहे ई शिवाई बसेस तसेच शिवनेरी बसची वारंवार मागणी करूनही अद्याप त्या आगाराला उपलब्ध झालेल्या नाहीत.
त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्याची नामुष्की आगारावर ओढवली आहे. असे असताना दिवाळीच्या हंगामात सातारा आगाराने तब्बल एक कोटी रुपयांचा विक्रमी नफा मिळवला. गुरुवारी सुद्धा सातारा आगारातून सातारा- पुणे व सातारा- बोरिवली या दोन मार्गाच्या तब्बल 24 फेऱ्यांचे नियोजन आगाराने कौशल्याने केले.
सातारा – कोल्हापूर, सातारा- इचलकरंजी, सातारा- पुणे, सातारा- मुंबई या मार्गांवरील गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली होती. दर वीस मिनिटाला एक गाडी सोडण्याची कसरत प्रशासनाला करावी लागल्याचे आगार व्यवस्थापक ज्योती जाधव यांनी सांगितले. सर्व्हर डाऊन झाल्याने रिझर्वेशन यंत्रणासुद्धा काही काळ ठप्प झाली होती. मात्र, तरीही प्रवाशांची अडचण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. पुणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असल्याने एसटी आगाराचे सहा फलाट गर्दीने ओसंडून वाहत होते. तसेच विनाथांबा गाड्यांसाठी दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. सातारा आगाराच्या यंत्रणेला बारा चालकांची जादा नेमणूक करावी लागल्याचे सांगण्यात आले.