चिंधवलीमध्ये भरवस्तीत घुसली मगर

जिगरबाज तरुणामुळे मगरीला पकडण्यात यश
सातारा  : चिंधवली (ता. वाई) येथे इनाम नावाच्या शिवारालगत एकविरा नावाचा डोह आहे. गेल्या महिनाभरापासून या डोहात मगर असल्याची केवळ चर्चा होती. मात्र रविवारी ही चर्चा सत्यात उतरली. ही मगर रविवारी रात्री दहाच्या सुमारास थेट मानवी वस्तीत घुसली. मात्र गावातील जिगरबाज युवकांनी वनविभागाशी संपर्क करून मगरीला पकडून दिले.

कृष्णा काठावर वसलेल्या चिंधवली गावात यापूर्वीही मगरीचा वावर होता. अनेक ग्रामस्थांना या मगरीला प्रत्यक्ष पाहिलेदेखील होते. चिंधवली गावापासून किसन वीर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर धनगर समाजाची वस्ती आहे. या वस्तीपासून काही अंतरावर इनाम नावाचे शिवार असून जवळच एकविरा नावाचा डोह आहे. गत महिनाभरापासून या डोहात मगर असल्याची चर्चा होती. मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने सापळादेखील लावला होता. मात्र, मगर काही हाताला लागली नव्हती.

रविवारी रात्री वस्तीवरील राजेंद्र मोरे आपल्या गुरांच्या शेडच्या बाहेर बसले होते, कसलातरी आवाज आल्याने त्यांनी बॅटरीने बघितले असता क्षणभर त्यांची बोबडीच वळली. कारण त्यांच्यापासून काहीअंतरावरच भली मोठी मगर आ वासून होती. त्यांनी तात्काळ केतन शिवाजी पवार या तरुणाला फोन करून बोलावून घेतले. केतन लगेच वडील शिवाजी पवार, भाऊ ओंकार तसेच सचिन मोरे, दत्तात्रय मोरे, गणेश मोरे यांच्यासह मगर असलेल्या ठिकाणी पोचला. तसेच केतनने वनपाल संग्राम मोरे यांनादेखील माहिती दिली, तेही तात्काळ त्याठिकाणी पोचले. तब्बल पाच तासांच्या कसरतीनंतर या सर्वांनी मिळून मगरीचा सोलच्या सहाय्याने बांधण्यात यश मिळवले.

सुरवातीला अचानक मगर पाहून आम्हीदेखील भयभीत झालो. आम्ही मगर पकडण्यासाठी पुढे जाताच मगर आमच्या दिशेने अंगावर झेप टाकत होती. मात्र, सोलच्या सहाय्याने कसेबसे आम्ही मगरीला पकडले.
– केतन मोरे, आधुनिक युवा शेतकरी.

Leave A Reply

Your email address will not be published.