“टिक-टॉक’ला बॅन करा

हायकोर्टात जनहित याचिका दाखल

मुंबई (प्रतिनिधी) – तरूणाईपासुन वृध्दांना वेड लावणाऱ्या टिक-टॉक हे मोबाईल ऍप रोखा, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील तीन मुलांची आई असलेल्या हिना दरवेश हिच्या वतीने ऍड. अली कासीफ खान देशमुख यांनी दाखल केलेली याचिका उद्या न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाच्या निर्दशास आणून देण्यात येणार आहे.

मोबाईल ऍप्लिकेशन असलेल्या टिक-टॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. त्यात अश्‍लील व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो. लहान मुलांच्या मनावर त्याचा विपरित परिणाम होतो. या व्यंगात्मक व्हिडिओंमुळे तरूणाईत आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे, असा आरोप करताना अनेकवेळा जातीवाचक मुद्यांवर व्हिडिओ प्रसारीत केले जात असल्याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होउन देशात जातीयवाद भडकू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच हे एक चायनीज मोबाईल ऍप्लिकेशन असल्याने यामागे भारताविरोधात छुपा मनसुबाही असू शकतो, अशी शक्‍यता या याचिकेतून व्यक्त करताना अशा व्हिडीओंमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत असून त्याचा एकंदरीत देशाच्या विकासावरही परिणाम होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

तसेच टिक-टॉक संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मुंबई पोलिसांकडून यासंबंधित दोन गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली आहे. मात्र त्या विरोधात योग्य प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही, असेही नमुद करण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी मद्रास हायकोर्टात अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती.

न्यायालयाने एप्रिलमध्ये स्थगिती दिली होती. मात्र या टिक-टॉकची ओनर असलेल्या बाईट डान्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणातून हात झटकत आपला या टिक-टॉक व्हिडीओशी संबंध नसल्याचा दावा करून हात झटकले. तसेच दिवसाला साडेतीन कोटी रुपयाचे नुकसान होत असल्याचा दावा केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मद्रास न्यायालयाने ही स्थगिती उठविली. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत टिक-टॉकवर अंतरिम स्थगिती द्यावी. त्यावर बंदी घालावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका उद्या न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाच्या निर्दशनास आणून देण्यात येणार असल्याची माहिती ऍड. अली कासीफ खान देशमुख यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)